Ad will apear here
Next
शिवाजीनगर बस स्थानक - आठवणींचा वटवृक्ष
छायाचित्र : चेतन दाणी

कोणी तरी म्हटले आहे, की संपूर्ण भारत बघायचा असेल, तर रेल्वेच्या स्टेशनवर बघा. मला वाटतं, सर्व महाराष्ट्र बघायचा असेल, तर एसटी स्थानक बघा. पुण्यातील शिवाजीनगर एसटी बस स्थानक म्हणजे आठवणींचा वटवृक्ष आहे. शेतकरी, विद्यार्थी, नोकरवर्ग, चाकरमानी, वारकरी, यात्रा-जत्रा करणारे, व्यापारी अशा सर्वांचे हे स्थानक. या स्थानकाशी निगडित माझ्या अनेक आठवणी आहेत. तशाच त्या अनेकांच्या असतील. 

शिवाजीनगर बस स्थानकाच्या जागेवर आता मेट्रो स्टेशन होत असल्याने स्थानकाचे स्थलांतर झाले आहे. त्या निमित्ताने अमित साळुंके यांनी केलेले हे स्मरणरंजन...
.........
पुण्यातील शिवाजीनगर एसटी बस स्थानक सुरू होऊन आता ५०-६० वर्षे झाली असतील. पहिल्या दिवशी पुणे ते अहमदनगर अशी गाडी सुरू झाली. आमचे पूर्वज शिवाजीनगर परिसरात नेताजी वाडी येथे राहणारे. योगायोगाने माझ्या वडिलांना नोकरी मिळाली ती एसटी महामंडळात स्वारगेटच्या आगारात. त्यामुळेच या लाल परीचे म्हणजेच एसटीचे आमच्या कुटुंबावर खूप मोठे उपकार आहेत. 



माझी शाळाही एसटी बस स्थानकासमोर होती. बालपणी लाभलेला हा खूप मोठा वर्दळीचा परिसर. हवशे, नवशे, गवशे सर्व प्रकारच्या माणसांनी फुलून गेलेला परिसर. तुळजापूर, आळंदी, तळेगाव दाभाडे, नेरे, मुंबई, कोयाळी, राजगुरूनगर, जेजुरी, दावडी निमगाव, देहू अशा अनेक ठिकाणी इथून प्रवास केला. दहावीला असताना परीक्षेचा अभ्यास करून कंटाळा आला, की रात्री आम्ही सगळे मित्रमंडळी एसटी आगारातील कँटीनला चहा व मस्कापाव खायला जात असू. गणेश विसर्जन मिरवणूक असो किंवा दत्तजयंतीनिमित्त त्यांनी ठेवलेले जेवण असो, सर्व ठिकाणी आपुलकी निर्माण करणारी माणसे भेटायची. दत्तजयंतीला आम्ही सर्व मित्र एसटी आगारात जेवायला जायचो. आमटी-भात, शाक भाजी (बटाटा, वांगी, हरभरा, वाटाणा) आणि पुरी, बुंदी असा फर्मास बेत असायचा. पोटपूजा चांगली व्हायची. 

आगाराच्या सर्व बाजूंनी हॉटेल, दुकानं आहेत. कोणी तरी म्हटले आहे, की संपूर्ण भारत बघायचा असेल, तर रेल्वेच्या स्टेशनवर बघा. मला वाटतं, सर्व महाराष्ट्र बघायचा असेल, तर एसटी स्थानक बघा. उसाच्या रसवंतीगृहातील घुंगरांचा आवाज, स्थानकात आलेल्या व फलाटावर उभ्या असलेल्या गाड्यांची माहिती माइकवरून सांगणारे लोक एसटी स्थानकांव्यतिरिक्त कदाचित संपूर्ण जगात कुठेही नसतील. 

इराणी हॉटेलमधील दाल फ्राय, भेजा फ्राय पाव यांच्या चवीपुढे फाइव्ह स्टार हॉटेलवाले गुडघे टेकतील. आगारात राहायला, जेवायला, झोपायला अनेक प्रकारची माणसं असायची. वारकरी, भिक्षुकी करणारी मंडळी, चोर, चरस, गांजा, ओढणारे असे सगळेच. कुणी कुटुंबातील भांडण झाले म्हणून रुसून स्थानकात आलेले. कोणी नोकरीच्या शोधात आलेला. स्थानकाने सर्वांना आधार, छत दिले. 

परिसरात दिवसभर लेमन गोळ्या, चिक्की, शेंगा विकणारा अब्दुलचाचा व ऊसाच्या रसवंतीगृहात काम करणारे तुकादादा जेवायला रात्री हमखास दत्तमंदिराच्या आवारात भेटायचे. जातीय दंगल झाली, की अनेक महाभाग एसटी बस फोडतात, जाळतात. त्यांनी आपल्या स्वत:च्या गाड्यांवर असा प्रयोग करून पाहिला पाहिजे. शेतकरी, विद्यार्थी, नोकरवर्ग, चाकरमानी, वारकरी, यात्रा-जत्रा करणारे, व्यापारी अशा सर्वांचे हे स्थानक. आपल्या गावातील घराहून वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून एसटीने पाठवलेल्या भाकऱ्या, चपात्या-चटणी यांची वाट पाहणारी मंडळीही स्थानकात गाडीची वाट पाहत असलेली दिसायची. 

जेजुरीचा पिवळा जर्द भंडारा, ज्योतिबा मंदिरात उधळण केलेला गुलाबी गुलाल अंगावर घेऊन प्रवास करणारे प्रवासी याच स्थानकाने दाखवले. या जागेवर आता मेट्रो स्टेशन होत आहे. ठीक आहे. काळ बदलला तशी माणसंही बदलली आहेत. परंतु आगारातील सुख-दुःख, चांगल्या-वाईट आठवणींचा पाऊस सदैव मला भेटायला येतो. तो तुम्हालाही आवर्जून भेटला असेल. कधी तरी शालेय सहलीच्या निमित्ताने, मामाच्या गावाला जाताना, नोकरीच्या शोधात असताना, पाहुणे येणार म्हणून, जाणार म्हणून, मित्रांच्या लग्नाला किंवा जत्रा-यात्रा-उत्सव यांना जाताना.. या वटवृक्षाच्या छायेत तुम्हीही कधी तरी आला असाल... आठवून बघा.

- अमित सुरेश साळुंके, नेताजीवाडी, शिवाजीनगर, पुणे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZUTCI
Similar Posts
स्वप्नं आणि स्वप्नं स्वप्नं... खूप खूप स्वप्नं.... एकामागून एक काही शुभ्र, काही काळी, तपकिरी.. निळी, हळवीसुद्धा...एकामागून एक येतात... मन डोलत राहतं... स्वप्नं पडत राहतात. त्याच्या पाठीवर पाय ठेवून सत्याचा जन्म होतो. मनाला बरं वाटतं...पायाखाली खरखरीत स्थैर्य येतं....पण
आकाशफुले...! जीए नावाचं गूढ थोडंसं उकलताना...! एखादा दिवस आयुष्याला असा काही धक्का देऊन जातो, की त्याची सुखद जाणीव प्रत्येक पावलासोबत जवळ राहते. तो दिवसही मनात वेगळा कप्पा तयार करून स्वतःहूनच त्यामध्ये जाऊन बसतो. अधूनमधून बाहेर डोकावतो, आणि नव्या दिवसावरही तो जुना, सुखद अनुभव गुलाबपाण्यासारखा शिंपडून जातो... अगदी अलीकडचा तो एक दिवस असाच, मनाच्या कप्प्यात जाऊन बसला
... तर मी ‘डिसेंबर’ झाले असते! मला कायम वाटतं, की मला कोणी एखादा महिना होण्याची संधी दिली असती, तर मी डिसेंबर झाले असते... मस्त गुलाबी थंडीचा, धुक्याच्या दुलईचा... शाळेतल्या स्नेहसंमेलनांचा, प्रेमाला बहर यायला अगदी आदर्श असलेला... सांताक्लॉजच्या ख्रिसमसचा, लग्न समारंभांचा, फिरण्याचा... भटकण्याचा... नाटक, गाणी, नृत्याच्या कार्यक्रमांची
आठवणीतले म्हसोबा देवस्थान (म्हसोबा गेट) आयुष्यात अशा अनेक जागा असतात, की त्या जागा आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या गोष्टी कधीही विसरल्या जात नाहीत. हमखास लक्षात राहतात. पुण्यात गणेशखिंड रस्त्यावर शेतकी महाविद्यालयाच्या आवारात म्हसोबा देवस्थान आहे, हे अशाच जागांपैकी.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language